Social media आणि instant messaging app यांनी सर्वसामान्य माणसांच्या जीवनात वेगळेच स्थान प्राप्त केले आहे. माझ्या मागील लेखात मी याच्या वापराबद्दल भरपूर लिहिले होते परंतु आज या माध्यमांच्या वापरापेक्षा त्यावरील पोस्ट ची सत्यता आणि पोस्टवरील प्रतिक्रिया यावर लिहावे असे प्रकर्षाने जाणवले म्हणून हा लेखन प्रपंच. माकडाच्या हाती कोलीत अशी काहीशी या माध्यमांची अवस्था आहे, कोणीही उठावे काहीही लिहावे आणि कोणाच्याही नावावर खपवावे असे काहीतरी सतत चालू असते. कोणालाही आपणास आलेल्या पोस्ट ची सत्यता पडताळून पाहण्यात रस नसतो, मात्र आलेली पोस्ट तात्काळ पुढे पाठवण्यात धन्यता वाटते. आपल्या राष्ट्रगीताला जगात एक नंबर मिळाला, गोठवलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे या आणि अशा अनेक गोष्टी बिनदिक्कतपणे पुढे पाठवल्या जातात. बऱ्याच लोकांना यामुळे मानसिक त्रास पण होतो, अगदी पाठवणाऱ्याला, ज्यांना पाठवले जाते त्यांना आणि ज्यांच्या नावावर ती पोस्ट खपवली जाते त्यांनाही. मात्र अश्या प्रकारच्या पोस्ट पाठवणाऱ्या अतिहुशार समूहाला काय म्हणावे हेच समजत नाही. यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडीच आहे. ...