महाराष्ट्राची 'मधुशाला'
एक गोष्ट मला आधीच स्पष्ट करु द्या.
मद्यपान ही माणसाची गरज नाही.
अगदी सैबेरियातल्या उणे 30-40 अंशात जगणाऱ्या माणसाला व्होडका गरजेची नसते.
तशी सहारा वाळवंट तुडवणाऱ्यालाही बियर उपयोगाची नसते.
मद्य हे अन्न नाही.
मद्यातून माणसाला कोणतंही (लौकिकार्थानं) जीवनसत्व, प्रथिनं, अन्नद्रव्यं मिळत नाहीत.
मुळातच दारुत उंची वगैरे असा काहीच प्रकार असत नाही.
"सिंगल माल्ट स्कॉच शिवाय कशालाही मी तोंड लावत नाही",अशी शेखी मिरवणारे उच्चभ्रू शहाणे आणि "पाच-पन्नास रुपयांची नारिंगी-मोसंबी ढोसणारे बिच्चारे," या दोन्हीतला गुणात्मक फरक शून्य.
अल्कोहोल नावाचं रसायन हे निव्वळ अल्कोहोल असतं...मग ते पन्नास वर्षं जुनं असो की पन्नास दिवसांपुर्वी बाटलीत भरलेलं.
'ट्वेन्टी इयर ओल्ड', 'व्हिंटेज वाईन' यासारखी सगळी थेरं म्हणजे ग्राहकाला भुलवण्यात प्रचंड प्रभावी आणि यशस्वी ठरेलली विक्री तंत्रं आहेत.
मी स्वतः नैमित्तीक मद्यपान करत असलो तरी मद्यपानाचं समर्थन अजिबात करत नाही.
'मद्यपान प्रतिष्ठेचं असतं', 'मद्यपान आणि उच्च अभिरुची यांचा संबंध आहे', 'उंची मद्यपान म्हणजे दर्जा' असलं कोणी बडबडत असेल तर ती शुद्ध भंपकबाजी आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
तरी ही दारू ओठाला लावण्याचे बहाणे शोधले जातात हे सत्य आहे. दारुचं व्यसन जडतं. आनंद झाला तरी तो पेल्यात डिचमळतो. दुःखाचा रितेपणा पेल्यातच बुडवला जातो. धुंदीचा षौक पेल्यात फसफसतो. गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, मूर्ख, ज्ञानवंत, ग्रामीण, शहरी यातल्या कुठल्याही भेदांना बाटलीजवळ जागा नसते. प्रांतागणीक, देशोदेशीच्या मद्यात फरक पडतो एवढंच काय ते. मेंदुला चेतवणाऱ्या, किंचीत ग्लानी आणणाऱ्या, क्षणिक उद्दपीत करणाऱ्या आणि अति प्राशन केल्यावर शुद्ध हरपणाऱ्या या मंतरलेल्या, रंगीत पाण्याची भुरळ भल्याभल्यांना पडत आली आहे. सातू, गहू, द्राक्ष, तांदूळ, ऊस, मोह अशा विविध धान्यांपासून, फळांपासून, फुलांपासून मद्य तयार होतं. हे मद्य माणसाची गरज नाही, त्याविना त्याचं काही अडत नाही.
या मद्याची चाह इतकी की वर्षानुवर्षं अनेक मिथकं, भ्रम या बाटलीभोवती गुंफले गेले आहेत. त्यांचं जतन केलं जात आहे.
'सिंगल माल्ट' आणि 'ब्लेंडेड' यावरुन अशीच प्रौढी मिरवण्याची पद्धत आहे. निव्वळ अडाणीपणा खरं तर हा. एकाच डिस्टिलरीतल्या कित्येक बुधल्यांमध्ये दारु ठेवलेली असते. बाटल्यांमध्ये भरताना अनेक बुधल्यांमधल्या या दारुची सरमिसळ होणं सहज गोष्ट झाली. तरी ती एकाच धान्यापासून केली असली तर तिला सिंगल माल्ट म्हणायचं. एवढंच नव्हे तर ती उच्च, हेही ठरवून टाकायचं. ब्लेंडेड म्हणजे कमअस्सल दर्जाची असं काही नसतं. तरीही हा फरक चांगलाच रुजला त्याला कारण ठरलं अत्यंत यशस्वी असं विक्रीतंत्र. पण आता मद्यपी फार ज्ञानी असल्याचा आव आणत त्याला श्रेष्ठत्वच देतात.
वास्तव काय तर ग्लेनफिडीच या नामवंत व्हिस्की कंपनीकडं बारा वर्षं जुन्या व्हिस्कीचा बराच साठा शिल्लक होता. त्या कंपनीला तो संपवायचा होता. त्यांच्या मार्केटींग तज्ज्ञांना कल्पना सुचली. ही गोष्ट आहे ती पन्नासच्या दशकाच्या अखेरची. त्या कंपनीनं 'सिंगल माल्ट' म्हणून व्हिस्कीचं ब्रॅडींग केलं. ही व्हिस्की इतरांच्या तुलनेत दर्जेदार आणि वैशिष्टपूर्ण असल्याचं सांगण्यास सुरुवात केली. गंमत म्हणजे लोकांनी ते पटवून घेतलंही. आता या गोष्टीला अर्धशतकापेक्षा जास्त काळ लोटला. पण तो पगडा आता कायमस्वरुपी बसला आहे. 'सिंगल माल्ट व्हिस्की'च्या विक्रीतली जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून ग्लेनफिडीच आज नाव राखून आहे.
'सिंगल' आणि 'ब्लेंडेड' यातला नेमका फरक न कळल्यानं अनेकांची फसगत होते. माझीही खूप वर्षं झाली. ''ब्लेंडेड प्यायचे दिवस गेले. आता सिंगल माल्ट असेल तरच घेतो,'' असं पल्लेदार वाक्य आता कोणी ऐकवलं की मनातल्या मनात खो-खो हसतो मी आणि शांतपणे समोरच्याच्या अभिमानी चेहऱ्याकडं पाहतो. खरं तर देशोदेशी या दोन्ही शब्दांचा अर्थ थोडाफार बदलतोच. ब्लेंडिंग म्हणजे साध्या भाषेत एकापेक्षा अधिक द्रव्यांचं मिश्रण...आणि सिंगल म्हणजे मिश्रण नसलेली, एका धारेची. पण हेही तितकसं बरोबर नसतं. कारण डिस्टलरीतल्या अनेक बुधल्यांमध्ये साठवलेली दारु एका बाटलीत येते तेव्हा ती ब्लेंडेडच ठरते. अगदी एकाच धान्यापासून गाळलेली असली तरी. त्यामुळं शंभर टक्के सिंगल असा प्रकार नसतो. त्यातल्या त्यात असं म्हणता येईल की एकाच धान्यापासून केलेली ती सिंगल. स्कॉटलंडमध्ये सातू आणि इतर धान्यांच्या मिश्रणापासून गाळलेल्या दारुला ब्लेंडेंड व्हिस्की म्हटलं जातं. अमेरिकेतली हीच ब्लेंडेड व्हिस्की इतर धान्यांच्या मिश्रणातून तयार झालेली असते. स्कॉटलंडमधली सिंगल माल्ट ही सातूच्या पिठापासून केलेली असते आणि सिंगल ग्रेन सातू आणि मका किंवा गहू किंवा या दोन्हीच्या मिश्रणापासून करतात. म्हणजेच सिंगल माल्टसुद्धा बऱ्याचदा एकाच डिस्टलरीमधल्या अनेक बुधल्यांच्या मिश्रणातून तयार होते. सिंगल असो की ब्लेंडेड अल्कोहोलच्या दर्जात फरक पडत नसतो.
दारुच्या वय किती यावरुनही अनेक खुळचट कल्पना रुजवल्या गेल्या आहेत. वाईन जितकी जुनी, जितकी मुरलेली तितकी अधिक दर्जेदार असते म्हणे. ''पन्नास वर्षांपुर्वीची स्कॉच आहे,'' अशी शेखी मिरवणारे तुम्हाला भेटतील. या दोघांनाही प्रत्युत्तर देत बसू नका. वा..वा म्हणत त्यांच्याकडील वाईनची-व्हिस्कीची बाटली शांतपणे रिकामी करा. निघताना पुन्हा एकदा त्याला म्हणा...मजा आली. तुझ्यामुळं इतकी दुर्मिळ, भारीतली दारु चाखण्याचा योग आला. नशेनं धुंद झालेलं त्याचं डोकं तुमच्या स्तुतीनं आणखी बथ्थड झालंय, याची खात्री झाल्यावर तुम्ही सावकाश निघून या. निघताना तुमच्या मनात मात्र एक गोष्ट पक्की हवी. आपण आता जे काही प्यायलो ते फार जुनं होतं म्हणून चांगलं होतं, असं अजिबातच नसतं. कारण व्हिस्कीच्या वयाचा आणि तिच्या दर्जाचा काडीचाही संबंध नसतो. हाही एक यशस्वी ठरलेला 'मार्केटिंग फंडा'च आहे. फार तर फरक एवढाच पडतो की, ज्या लाकडाच्या बुधल्यात ती व्हिस्की अनेक वर्षं साठवून ठेवलेली असते त्या लाकडाचा गंध आणि रंग त्या व्हिस्कीत उतरतो आणि त्यामुळं चव आणि दिसणं बदलंत. धान्य कोणतं होतं, कोणत्या मातीत उगवलं, कोणत्या पाण्यावर पोसलं, दारु गाळण्याची पद्धत काय होती, साठवताना तिच्यात कोणते मसाले मिसळले यामुळं थोडाफार फरक पडतो. यापेक्षा अधिक काहीही नाही. याचा संबंध त्या दारुतल्या अल्कोहोलच्या दर्जाशी असत नाही.
हेही कसं सुरु झालं? तर बरीच वर्षं शिल्लक राहिलेली व्हिस्की लवकर खपावी म्हणून तिचं वय सांगून भुलवण्याचा प्रयत्न झाला. तो भलताच यशस्वी ठरला आणि मग प्रथाच पडून गेली व्हिस्कीचं वय सांगण्याचं. आता '12 इयर ओल्ड' वगैरे हवे ते आकडे टाकून व्हिस्की सर्रास खपवली जाते. त्यामुळं झालं काय की, व्हिस्की जितकी जुनी तितकी महाग असली परंपरा सुरु झाली. व्हिस्की अनेक वर्षं साठवून ठेवण्यासाठी लागणारी जागा, थंड तापमान राखण्यासाठी होणारा खर्च याची किंमत ग्राहकाकडून वसूल केली जाते. या मठ्ठपणाचं आणखी एक उदाहरण मी पाहिलं आहे. विकत घेतानाच '12 इयर ओल्ड' म्हणून बाटली घेतलेली असते. तीच बाटली घरात पाच-दहा वर्षं ठेवतात आणि ती फोडताना उगीचच छाती फुगवली जाते...''ट्वेन्टी इयर ओल्ड नाऊ...जस्ट फॉर यू.'' अशा महोदयांनाही अजिबात शहाणं करायला जाऊ नये. पण आपल्याला मनात हे माहिती असलं पाहिजे की, काचेच्या बाटलीत शंभर वर्षं जरी ती व्हिस्की हवाबंद राहिली तरी तिच्या रंगात-गंधात-चवीत कणभरही फरक पडत नसतो. त्यामुळं तिचं वय मोजण्याचा आणि तो सांगण्याचा अडाणीपणा कृपया करु नका.
त्यातही पुन्हा गंमत अशी असते की अनेक उत्पादक कंपन्या, वीस वर्षे जुनी व्हिस्की चमचाभर मिसळतात नव्या व्हिस्कीच्या बाटलीत आणि तीच विकतात ट्वेन्टी इयर ओल्ड म्हणून. कारण त्या उत्पादकांना हे चांगलं माहिती असतं, की दर्जात-चवीत काहीही फरक पडत नसतो. सगळा खेळ पर्सेप्शनचा आहे. ग्राहकाच्या मानसिकतेशी खेळण्यासाठी एक चमचा पुरतो. खोट्या प्रतिष्ठेसाठी पैसे मोजणारे चिक्कार असतात. त्या-त्या वर्षीचा डिस्टलरीचा खप, उत्पादन लक्षात घेऊन कोणत्या नावाखाली ब्रॅडींग करायचं, 'ट्वेल्व इयर ओल्ड' विकायची की 'फिफ्टीन' की 'ट्वेन्टी' हे ठरवलं जातं. स्कॉच व्हिस्की असोसिएशनचा नियम इतकंच सांगतो की, बाटलीवर तुम्हाला वयाचा उल्लेख करायचा असेल तर तो किमान चार वर्षांचा असला पाहिजे. मग तुम्ही त्या बाटलीत एक टक्का दहा वर्षं जुनी मिसळा आणि उरलेली 4 वर्षें जुनी मिसळा तुम्ही ती 'टेन इयर ओल्ड' म्हणून विकू शकता अगदी बिनधास्त. त्यामुळं 'ओल्डर इज गोल्ड' हे व्हिस्कीच्या जगात निर्माण केलेलं, जतन केलेलं आणि सातत्यानं वाढवंत नेलेलं सगळ्यात मोठं मिथक आहे.
कॅलिफोर्नियातल्या नापा व्हॅलीत गेलो होतो तेव्हा अठराव्या-एकोणिसाव्या शतकात तिथं उभारलेल्या वायनरींमध्ये जाऊन आलो. दिवसभर मुबलक वाईन चाखली. एकही डॉलर खर्च न करता. 'टेस्टींग'साठी तिथल्या मादक पोरी आग्रहानं पाजत होत्या. मी पीत होतो. या बहुतेक वायनरी फ्रेंच-इटलीतून स्थलांतरित झालेल्या ख्रिश्चन धर्मगुरुंनी किंवा त्यांच्या शिष्यवर्गानं त्यांच्या स्वतःसाठी चालू केलेल्या होत्या. कालौघात त्या व्यावसायिकदृष्ट्या मोठ्या झाल्या. व्हिस्कीसारखाच भ्रम वाईनच्या बाबतीतही जोपासलेला आहे. वाईन जितकी जुनी, मुरलेली तितकी ती अधिक उत्तम आणि अर्थातच खूप महागही असं सांगितलं जातं. हाही भ्रमाचा मोठा भोपळा.
नापा व्हॅलीतून व्हाईट आणि रेड वाईनच्या दोन-दोन बाटल्या घेतल्या होत्या. त्याही असं सांगण्यात आलं की, या तुम्हाला आमच्या वायनरीशिवाय जगात कुठंच विकत मिळणार नाहीत म्हणून. 'एक्सक्लुझिव्ह' होत्या आणि त्याहून महत्वाचं म्हणजे चव एकदम आवडून गेली होती. मिठ्ठास, मेंदुला हलका झटका देत तन-मन सैल करणारी वाईन होत्या त्या. माहिती देताना त्यानं काही आडपडदा ठेवला नव्हता. त्यानंच सांगितलं, पहिला घोट मस्तपैकी जिभेवर घोळवत, घोळवत रिचवला आणि त्याक्षणी तो आवडला की संपलं. बाकी वाईनची वेगळी कोणतीही टेस्ट नसते. ज्याची त्याची आवड हीच एकमेव टेस्ट.
मग वाईनच्या वयाचं काय, हे मी विचारलं होतं. मिळालेलं उत्तर असं होतं - वाईनचा इतिहास अगदी आठ हजार वर्षांपर्यंत मागं जाणारा आहे. भूमध्य समुद्राच्या भोवती द्राक्षांची शेती सुरु झाली आणि वाईनंच उत्पादन घेतलं जाऊ लागलं. त्यावेळी रोमन मंडळींना वाईनमध्ये भलताच रस होता. त्यांनी वाईन साठवायला सुरुवात केली. पण त्या प्राचिन काळी ताज्या रसरशीत द्राक्षांपासून केलेली ताजी वाईन हीच सर्वोत्तम समजली जायची. घरात मस्त अधमुंर सायीचं दही लावावं, दही टांगून चक्का करावा यात भारतीय स्त्रिया जितक्या पटाईत होत्या (होत्याच म्हणावं ना आता.) तसं त्याकाळच्या रोमन स्त्रिया घरगुती वाईन तयार करण्यात तरबेज होत्या. घरोघरी बनायची वाईन. वाईन दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचं शास्त्र अजून अवगत व्हायचं होतं.
मग जुनी तितकी चांगली हे वाईनच्या बाबतीत आलं कधीपासून, स्वाभाविकपणे माझा पुढचा प्रश्न होता. जेव्हा काचेच्या बाटल्या आणि त्या बंद करण्यासाठी कॉर्क (झाडाच्या सालीपासून केलेली बुचं) यांचा शोध लागला तेव्हापासून जुन्या वाईनची फॅशन आली. तिचाही जन्म मार्केटिंग गिमिक्समधूनच झालाय. अठराव्या शतकाच्या पुढं-मागं हे घडलं. अर्थात सुरवातीला सगळ्या वाईनच्या बाबतीत असं होत नव्हतं. वाईन तयार झाली की ती शक्य तितक्या लवकर रिचवण्याचीच पद्धत होती. पण त्यातही वेगळेपणा असलेल्या उदाहरणार्थ फ्रान्सची शॅंपेन, ऱ्हाईन नदीच्या पाण्यावर पोसलेल्या द्राक्षांची जर्मन व्हाईट वाईन, हंगेरीतली गोडसर डिझर्ट वाईन असे मोजके अपवाद वगळता वाईन तयार झाली की ती संपवली जायची. फार मोठ्या प्रमाणात व्यावसायिकीकरणही झालेलं नव्हतं. गाव पातळीवर तयार करायची तिथंच संपवायची असा सगळा तो मामला. आपल्या सांगली-सोलापुर-कोल्हापुरकडं खवा-बासुंदीच्या भट्ट्या असतात तसं काहीसं. वाईन बाटल्यांमध्ये भरुन तिची वाहतूक, साठवणूक करणं यात सुधारणा झाल्यावर मग जुन्या वाईनचं कौतुक जन्माला घातलं गेलं. काहीतरी वेगळेपणा ठसवून गिऱ्हाईकाच्या खिशातून चार पैसे अधिकचे काढून घेण्यासाठी.
गेल्यावर्षी इंग्लंडला गेलो होतो तेव्हा तिथल्या गेरीज वाईन अँड स्पिरीटमध्ये डोकावून आलो. फक्त मद्यविक्री करणाऱ्या या दुकानांची साखळी इंग्लंडमधल्या बहुतेक सगळ्या मोठ्या शहरात आहे. या दुकानात मद्याचे सगळे प्रकार मिळतात. प्रचंड महाग आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असा किमतीचा लांबलचक स्तर असतो. म्हणजे अगदी दीड-दोन लाख रुपयांपेक्षा महाग एखादी स्कॉच ते पाच-सहा हजार रुपयांपर्यंतचीही एखादी व्हिस्कीची बाटली. प्रत्येक ब्रॅंडची महती सांगण्यासाठी आणि तुमच्या खिशाचा अंदाज (लायकी) घेत तुम्ही कोणतं मद्य घ्यायला हवं, हे सुचवण्यासाठी बोलके, चटपटीत सेल्समन असतात या दुकानात. तुम्ही खरोखरच बाटली घेतल्याशिवाय दुकानातून बाहेर पडणार नाही, हे लक्षात आल्यानंतर टेस्टिंगसाठी चिमुकले चषक तुमच्यापुढं केले जातात. मी फार बडा संभाव्य बडा ग्राहक आहे, असं त्याला गंडवण्यात मी बहुधा यशस्वी झालो होतो कारण त्यानं मला तीन-चार वेगवेगळ्या मद्याच्या चवी चाखवल्या. मीही खास इंग्लिश स्टाईलमध्ये डोळे मोठे करुन, ओठाचा चंबू करुन त्याचं कौतुक करत गेलो. त्याची उमेद वाढली होती त्यामुळं. प्रत्यक्षात मी काहीही न घेता तिथून बाहेर पडलो होतो.
पण त्या दुकानात मी पाहिलं ते असं की काचेच्या बाटल्यांचे अत्यंत आकर्षक आकार हे खूप महत्वाचे ठरत होते. शुभ्र, पारदर्शक, उच्चकोटीच्या काचेच्या बाटल्या आणि त्यांच्यावरची कलाकुसर हा खेचून घेणारा ठळक मुद्दा असायचा. त्या कोंदणाच्या आतली सोनेरी, गर्द सोनेरी, गुलाबी झाकाची, लालसर अशा निरनिराळ्या छटांमधलं मद्य डोळ्यांना आनंद देणारं होतं. मद्य उंची असो की नसो त्याचं कोंदण अतिशय उंची असावं लागतं. बाटली जेवढी सुंदर तेवढी किंमत जास्त असा ढोबळ आडाखा मी लगेच बांधला आणि तो बहुतांश बाटल्यांच्या बाबतीत अचूक ठरला होता. पॅकेजींग फार महत्वाचं.
दारु जेवढी महाग तेवढी उच्च कोटीची हा आणखी एक भ्रम. बाटलीची किंमत बघून तिचा दर्जा ठरवण्याची पद्धत असते. पण मघा म्हटलं तसं ही किंमत बहुतेकदा पॅकींग, ब्रॅडींगचीच जास्त असू शकते. मद्याचं वय आणि दर्जा यांचाही थेट संबंध अजिबात नसतो. जुन्या मद्याला महाग मोल असतं म्हणजे त्या दर्जेदार असतातच, असं नाही. तरीही भलेभले मद्यपी बाटलीची किंमत, त्यावर लिहिलेलं मद्याचं वय यावरुन तिचा दर्जा जोखण्याचं काम करतात. (ज्याचा त्याचा खिसा, ज्याची त्याची निवड)
'स्कॉच' या शब्दाला तर भलतीच प्रतिष्ठा आहे. खास करुन काही मराठी संपादक, राजकारणी, साहीत्यिक यांनी 'स्कॉच'ला असं काही स्थान मिळवून दिलं आहे की ज्याचं नाव ते. स्कॉच म्हटल्यावरच जीभ दातात धरून कानाची पाळी पकडणारे अर्धवट मी पाहिलेत. स्कॉच या नुसत्या शब्दावर भुलणाऱ्यांच्या, लाळ गाळणाऱ्यांच्या गोष्टी ऐकल्या आहेत. स्कॉचचा सरळसोट अर्थ इतकाच आहे की, स्कॉटलंड नावाच्या देशात तयार होणारी व्हिस्की. बस्स. यापेक्षा जास्त काही नाही. नागपुरची संत्री, देवगडचा हापूस, जळगावची केळी, मंगळवेढ्याची ज्वारी तशी स्कॉटलंडची स्कॉच. पण हॉलिवूडच्या सिनेमांनी आणि इंग्रजी साहित्यातून स्कॉचचं इतकं सुंदर मार्केटींग वर्षानुवर्षं होत आलंय की आपल्याकडच्या पश्चिमाभिमूख मंडळींनी उत्तम दर्जाची स्कॉच, भारीतली स्कॉच या शब्दांना अमृताच्या पायरीवर नेऊन ठेवलं आहे.
वास्तवात इतर कोणत्याही देशातली व्हिस्की आणि स्कॉच यात फरक नाही. मद्याचा प्रकार कोणताही असो. त्याचं नाव काहीही असो. ती ऱ्हाईन नदीच्या पाण्यानं तयार झालेली असो की दक्षिण आफ्रिकेतल्या द्राक्ष मळ्यात. सगळ्या मद्यांमधला लसावि काय तर प्रत्येकात अल्कोहोल असतं. आणि दारुचं जे काही वेगळेपण आहे ते याच रसायनामुळं आहे. दारुचं जेवढी म्हणून काही महती, दोष, गुण, दुर्गुण आहेत तेही फक्त आणि फक्त या एकाच रसायनामुळं आहेत. सत्य इतकंच आहे. म्हणूनच दारु उंची आणि किरकोळ दर्जाची असं काही नसतं. कोणी कोणत्या चवीला, रंगाला आणि गंधाला भुलावं हा सवयीचा, आवडीचा आणि ज्याच्या-त्याच्या खिशाचा सवाल असतो.
थोडक्यात हे दारुपुराण सांगण्याचं कारण काय तर सध्या सरळ-सरळ दोन गट अगदी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. याचं कारण ही दारु आहे. सरसकट दारुबंदी करावी, हा आग्रह असणारी एक बाजू फार जुनी आहे. त्याचा प्रतिवाद करत शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळवून देण्याची क्षमता असल्यानं फक्त ऊस, द्राक्षंच काय अगदी ज्वारी-बाजरीसारख्या धान्याचीही दारु गाळा, असा आग्रह धरणारी दुसरी बाजू आहे. दारुची प्रचंड आसक्ती असणारा भला मोठा वर्ग एका बाजूला, तर तिची साथ कायमची सोडा असा आग्रह धरणारा वर्ग दुसऱ्या बाजूला.
दारु चांगली की वाईट, ही चर्चा फिजूल आहे. कारण दारुचा नाद ऐच्छिक आहे आणि तो माणसाच्या प्रगतीच्या इतिहासाइतकाच जुना आहे. बाटलीच्या प्रेमात किती बुडायचं, हे ज्याच्या-त्याच्या सारासार विवेकबुद्धीवर अवलंबून आहे. पण हे व्यक्तिगत झालं. सरकारला भूमिका घेणं भाग आहे. केवळ तिजोरी भरण्यासाठी दारुविक्रीला प्रोत्साहन देण्याचं धोरण सरकार ठेवणार असेल तर तारतम्य नावाची काही गोष्ट आहे की नाही, असा प्रश्न सरकारला विचारावा लागेल. सध्या कोरोनानं आणलेल्या वैश्विक साथीचा काळ आहे. या काळात दारुविक्री रोखली असती तर फारसं बिघडलं नसतं. राज्याच्या तिजोरीत भर टाकण्यासाठी फक्त दारुच दिसावी हे सत्ताधाऱ्यांचं बुद्धीदारिद्र्य आहे. केंद्रात जे तेच राज्यात. राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना जास्त दोष द्यावा लागेल कारण दारुविक्रीतून येणारा महसूल फक्त राज्याच्याच तिजोरीत जातो म्हणे.
आणखी दोन-तीन महिने नसती दारुविक्री झाली तर तिजोरीतले अंदाजे तीन-साडेतीन हजार कोटी कमी झाले असते. पण या रकमेसाठी साथ पसरवण्याचा धोका सरकारनं स्विकारला. दारुच्या दुकानांभोवती राज्यात ज्या पद्धतीची गर्दी उसळली, त्यावरुन हे लक्षात येतं. या मद्यपींमुळं निर्माण होणारे सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक प्रश्न ते वेगळे. खरं म्हणजे सध्याच्या सरकारमध्ये असणाऱ्या तीन पक्षांपैकी एका पक्षाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि उर्वरीत दोन पक्ष उठता-बसता शाहु-फुले-आंबेडकर ही जपमाळ ओढणारे. आता सत्ताधाऱ्यांची ही सगळी दैवतं मद्यपानाच्या विरोधातली. पण व्यवहार जपताना दैवतांच्या आवडीनिवडी जपण्याची चैन परवडणारी नाही. तसं असतं तर मग थेट कायमचीच दारुबंदी नसती का केली?
मुद्दा इतकाच की बाबांनो...जनहितासाठी महसूल कमवणं, ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. फक्त एक करा. दारुविक्रीला प्रोत्साहन देत असताना शेतकऱ्यांचंही कल्याण करा. आता ज्वारी, बाजरीपासूनही दारु तयार झाली पाहिजे. गेले अनेकवर्षं हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. दांभिकपणा सोडा. दारुविक्री देशातल्या कोणत्याच राज्याला आणि केंद्र सरकारलाही बंद करायची नाहीए. मग नैतिकतेच्या गुंत्यात न अडकता नीट धोरण तरी आखा.
(ज्याला हवा त्याचा) काठोकाठ भरु द्या प्याला,फेस भराभर उसळू द्या !
होऊ द्या महाराष्ट्राची 'मधुशाला'.
बागायती ऊस मळेवाले समाधान पावतील.
द्राक्षं बागायतदार खूष होतील.
कोरडवाहू ज्वारी-बाजरीवाले दुवा देतील.
मोहाची फुलं वेचणारे आदिवासी हरखतील.
महाराष्ट्राचा बडा ब्रॅंड करा. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या मद्यांचे जोरदार मार्केटींग करा. जुगार, मदिरा, मदिराक्षीत डुबवून टाकणारी आणि कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणारी अमेरिकेतली 'लास व्हेगास'सारखी मायानगरी उभी करा महाराष्ट्रात.
बक्कळ महसूल गोळा करा. सत्तेत बसलेली बहुतेक सगळी शेतकऱ्याचीच पोरं असतात. शेतकऱ्यांची काळजी तुम्ही नाही करणार तर कोण?
ता. क. - दारुचं समर्थन मी कदापी करत नाही. खरं वाटत नसेल तर सुरुवात जिथून केली ते पुन्हा वाचा. कोणी प्यावी, किती प्यावी, कोणती प्यावी हा ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि खिशाचा प्रश्न आहे. मला त्यासंदर्भात काहीच म्हणायचं नाहीए.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा