Social media आणि instant messaging app यांनी सर्वसामान्य माणसांच्या जीवनात वेगळेच स्थान प्राप्त केले आहे.
माझ्या मागील लेखात मी याच्या वापराबद्दल भरपूर लिहिले होते परंतु आज या माध्यमांच्या वापरापेक्षा त्यावरील पोस्ट ची सत्यता आणि पोस्टवरील प्रतिक्रिया यावर लिहावे असे प्रकर्षाने जाणवले म्हणून हा लेखन प्रपंच.
माकडाच्या हाती कोलीत अशी काहीशी या माध्यमांची अवस्था आहे, कोणीही उठावे काहीही लिहावे आणि कोणाच्याही नावावर खपवावे असे काहीतरी सतत चालू असते. कोणालाही आपणास आलेल्या पोस्ट ची सत्यता पडताळून पाहण्यात रस नसतो, मात्र आलेली पोस्ट तात्काळ पुढे पाठवण्यात धन्यता वाटते. आपल्या राष्ट्रगीताला जगात एक नंबर मिळाला, गोठवलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे या आणि अशा अनेक गोष्टी बिनदिक्कतपणे पुढे पाठवल्या जातात.
बऱ्याच लोकांना यामुळे मानसिक त्रास पण होतो, अगदी पाठवणाऱ्याला, ज्यांना पाठवले जाते त्यांना आणि ज्यांच्या नावावर ती पोस्ट खपवली जाते त्यांनाही.
मात्र अश्या प्रकारच्या पोस्ट पाठवणाऱ्या अतिहुशार समूहाला काय म्हणावे हेच समजत नाही. यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडीच आहे.
आपला मूर्खपणा लोकांना समजू नये यासाठी तोंड बंद ठेवावे अश्या अर्थाची एक म्हण आहे, परंतु त्यामध्ये वरील गोष्टही समाविष्ट करावी लागेल.
असो, दुसरी गोष्ट म्हणजे पोस्ट वरील प्रतिक्रिया!
कोणाचा काही मेसेज आला की काही लोकांना त्यावर प्रतिक्रिया देण्याची अतिघाई होते, अर्थात त्या पोस्टला किती किंमत द्यायची आणि किती पटकन त्यावर प्रतिक्रिया द्यायची यावरून तुमची पण बौद्धिक पात्रता लोकांना कळते, त्यामुळे प्रतिक्रिया द्यायची गरजच असेल तर त्या माणसाला वयक्तिक प्रतिक्रिया द्या, दुसरे असे की आपण पोस्ट करणाऱ्याला कमी लेखायला जातो परंतु आपल्याला पण तेवढाच कमीपणा येतो.
Social media अर्थात समाज माध्यम वापरणार्यांना माझी नम्र विनंती आहे की आपल्या पोस्ट ह्या आपली बौद्धिक पातळी दाखवतात त्यामुळे आपल्या पोस्ट अश्या असाव्यात की आपली बौद्धिक पातळी सिद्ध करण्याची गरज किंवा आटापिटा करावा लागणार नाही. अर्थात बरेचसे मेसेज हे केवळ फॉरवर्ड केलेले असतात आणि पाठवणारा त्या मेसेज मधील तत्वज्ञान पाळणारा असतोच असे नाही. बरेचसे मातृभक्त मेसेज पाठवणारे घरात आईवडिलांना व्यवस्थित सांभाळत असतीलच असे नाही त्यामुळे उगाच आपण खूप भारी तत्वज्ञानपूर्ण मेसेज पाठवला म्हणजे तत्वज्ञानी झालो असे नाही, ते सर्व आपल्या आचरणात दिसले म्हणजे झाले. मग आपल्याला आपल्या हुषारीची जाहिरात करावी लागणार नाही.
इतके सगळे झाल्यावर तरी काही लोकांच्या जीवनात थोडासा प्रकाश पडेल अशी आशा बाळगतो, धन्यवाद.
वरील लेखात कोणाच्याही वयक्तिक भावना दुखावण्याचा हेतू नाही फक्त समाजमाध्यम वापरण्याची जबाबदारी सर्वाना कळावी हाच प्रांजळ हेतू आहे.
©अजय कपिले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा