सोशल मीडिया वर रोज येणाऱ्या संदेशाबद्दल काहीतरी लिहावं असं बरेच दिवसापासून वाटत होत, आज सुरुवात केलीय.
रोज सकाळी उठल्यावर मोबाईल घेतला की आपल्याही अगोदर ब्रम्ह मुहूर्तावर उठून शुभ संदेश पाठवणारे बरेच महात्मे आहेत याची प्रचिती येते. असो, शुभ सकाळ, शुभ ... वार, शुभ ... तिथी यासारखे संदेश आपल्या मोबाईल मधून ओसंडून वाहत असतात. असे असेल तरी हरकत नाही, परंतु बरेच महाभाग चित्र संदेश पाठवतात, म्हणजे आपल्याला आलेला चित्रमय शुभ संदेश दुसऱ्याला पाठवतात. हे म्हणजे आपल्याला मिळालेले ग्रीटिंग कार्ड नाव खोडून दुसऱ्याला त्याचे नाव टाकून पाठवण्यासारखेच आहे.
साधा शुभ सकाळ किंवा गूड मॉर्निंग असा लिहून संदेश पाठवणे म्हणजे बऱ्याच लोकांना मागासले पणाचे लक्षण वाटते.
आपण एक उदाहरण घेऊ. समजा एका व्यक्तीला त्याच्या एका ग्रुप मध्ये 10 लोकांनी सचित्र शुभ संदेश पाठवला तर एका संदेशाची साईझ 50 kb असेल तर 10 संदेश म्हणजे 500 kb. असे 10 ग्रुप चे एकूण संदेश असा विचार केल्यास 5000 kb. म्हणजेच 5 mb इतका डाटा केवळ शुभ सकाळ संदेश वाचण्यासाठी खर्च होतो.
दिवसभर इतर संदेश येतात ते सोडले तरी परत शुभ रात्री चे तेच गणित.
यात अजून व्हिडिओ संदेश याची गणना केली नाही.
बरं जो व्यक्ती पाठवतो त्यालाही तितके नेट वापरावे लागते. आणि प्राप्त करणाऱ्यालाही तेवढेच नेट वापरावे लागते.
या सगळ्या गोष्टीत आपला बहुमूल्य वेळ खर्च होतोच आणि वर आपण दुसऱ्याचा सुद्धा अनमोल वेळ आणि नेट पॅक खर्च करायला भाग पाडतो. त्यात अजून विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे अर्थहीन संदेश पाठवणे.
ह्या एकंदर परिस्थितीचा विचार केला की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, आपल्या कडे इतका फालतू वेळ आहे का. काही लोक रतीब घातल्या सारखे चित्र संदेश पाठवित असतात.
खरेच या सर्व गोष्टींची गरज आहे का? हे म्हणजे वृत्तपत्रात शुभ सकाळ असा संदेश पाठवणे असे झाले, ज्याला वाचायचे त्याने वाचा. काही महाभाग चार चार दिवस अगोदरच एखाद्या सणाबद्दल संदेश पाठवायला सुरुवात करतात. मग इतरही लोकांचं उत्साह वाढतो आणि तो सण साजरा करतानाही "...सणाच्या चार दिवस अगोदर शुभेच्छा" असा संदेश आपल्याला येत असतो.
या सगळ्यात मला कुणाला दुखावण्याचा किंवा कमी लेखण्याचा बिलकुल हेतू नाही. परंतु जर सर्वांनी गरज असेल तेव्हाच संदेश पाठवले तर आपल्या संदेशाची दखल समोरचा लवकर घेईल असे माझे मत आहे.
रोज येणाऱ्या पाहुण्याची जशी किंमत राहत नाही तसेच काहीसे आपल्या रोजच्या संदेशा बद्दल होते आहे.
माहितीपूर्ण, गरजेचे, आणि ज्ञान वर्धक असे संदेश जरूर पाठवावेत. जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल.
दुसरे असे की हे ज्ञानाचे डोस पाजणारे बहुतेक वेळेस स्वतः कोरडे पाषाण असतात. माफ करा, परंतु जे आपण आचरणात आणले आहे किंवा अनुभवले आहे किंवा ज्याची आपण खातरजमा केलेली आहे असेच संदेश पुढे अग्रेशित करा जेणेकरून अफवा किंवा खोट्या गोष्टी पसरण्यास पायबंद होईल.
असो, शेवटी ज्याची त्याची मर्जी.
मला जे वाटले ते लिहिले आहे. सर्वांनी एकदा विचार करा.
@अजय
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा