मुख्य सामग्रीवर वगळा

श्री. गिरीष लाड यांची पोष्ट

लहानपणापासून मी देव मानणारा, कुंभ रास असल्याने नियमितपणे शनिवारी शनिमंदिरात जावून तेल वाहणारा आणि इतर सगळे धार्मिक कर्मकांड करणारा होतो.

जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती आली तेव्हा तेव्हा देवाशी भावचाल पण केली. हे झाल तर ते देईन, अस झाल तर तस करीन वगैरे वगैरे प्रत्येक वेळी हि शंका होतीच कि असे खरच होत असते का?

देव खरच आहे का? पण गांभीर्याने विचार कधीच केला नव्हता. वाटायचं कि इतकी वर्ष सगळे देव देव करताहेत, सगळी मोठी, थोर मानस देव मानताहेत, म्हणजे असेल. आपण कशाला नसत्या उद्योगात पडायचे. नुकसान काय आहे? झाला तर फायदाच आहे. आणि शिवाय गरज पडल्यावर शेवटी देव सोडून कुठे जाणार आपण? परत मेल्यानंतर खरच देव असला, स्वर्ग नर्क असला तर? कशाला चान्स घ्या. म्हणून सगळे सुरळीत चालले होते.

माझी आणि माझ्या आजीची (ती आत्ता ८५ वर्षांची आहे) नेहमी जुगलबंदी चालायची. मी एन सी सी मध्ये होतो आणि नेहमी शनिवारीच दाढी केली नसल्याची आठवण यायची, परत रविवारी सकाळी एन सी सी ला उशीर झाला तरी शिक्षा आणि दाढी नाही केली तरी शिक्षा, त्यामुळे शनिवारी माझी आणि आज्जीची चकमक ठरलेली.

ती नेहमी ओरडायची कि शनिवारी दाढी करू नये, मग मी तिला कारण विचारायचो आणि ती म्हणायची कि शास्त्रात लिहिलंय. मग माझा पुढच प्रश्न, कुठाय शास्त्राच पुस्तक, आणि तू कधी वाचाल? अशी आमची अनेक भांडणं व्हायची, प्रत्येक वेळी हे असे का, ते तसे का? आणि एकच उत्तर मिळायचे कि शास्त्रात लिहिले आहे. प्रश्न विचारू नको, सांगते ते गपचूप कर.

प्रत्येक वर्षी दिवाळीला लवकर उठून अंघोळ कर नाहीतर नरकात जाशील, याच्यावरून तर गमती जमती ठरलेल्या. मी तिला चिडवायचो, कि अमेरिकेतील सगळे लोक नरकातच भेटतील.

२०१० साली दाभोलकरांना पहिल्यांदा भेटलो. साधना साहित्य संमेलन कोल्हापुरात भरल होत आणि तिथे मी पाणी प्रश्नावर एक ऑडियो पुस्तक बनवले होते त्याचे प्रकाशन अमोल पालेकरांच्या हस्ते होते. तेव्हा डॉक्टरांची आणि माझी पहिली भेट झाली. तो पर्यंत खरतर अंधश्रद्धा निर्मुलन वगैरे काही माहित नव्हते.

मग डॉक्टरांशी अजून परिचय झाला आणि पुढे बरच वाचण्यात पण आल. माझ्या गर्भलिंग निदान रोखण्याच्या  कामाला पाठबळ देणारे डॉक्टर एकमेव सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती होते. बाकीचे विरोधच करत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी कौतुक आणि कुतूहल जास्तच वाढले.

पुढे त्यांच्या व्याख्यानांच्या ऑडियो सीडी बनविण्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा झाली आणि आम्ही त्यांच्या १० व्याख्यानांची ऑडियो सीडी काढायचे ठरवले.

१० दिवसांकरता एक स्टुडियो बुक केला आणि आम्ही रोज सकाळी स्टुडियोत भेटू लागलो. ते एकसंध व्याख्यान करायचे आणि मी एकमेव श्रोता. त्या १० व्याख्यानाचा माझ्यावर खूपच परिणाम झाला आणि मी स्वतः विचार करू लागलो. डॉक्टर नेहमी म्हणायचे कि माझ पटत नसेल तर हरकत नाही, पण मी काय म्हणतोय ते एकाल तरी? विचार तर कराल?

हळू हळू एक एक गोष्ट उलगडत गेली आणि मी विचार करण्याबरोबरच  इतरांशी चर्चाहि करू लागलो. एक प्रश्न शेवटी नेहमी सगळे विचारायचे कि देव आहे कि नाही? मी पण सगळे तर्क लावून विचार केला, डॉक्टरांचेहि मत एकले. त्यापुढे मला उत्तर सापडले ते असे कि .......

देव हि संकल्पना आहे. कुणी गणपतीला देव म्हणतात, कुणी तिरुपती, कुणी अल्ला, कुणी जिजस इत्यादी इत्यादी. म्हणजे देव म्हणून तुम्हाला कुणीतरी सांकेतिक स्वरुपात म्हणजे मूर्ती स्वरुपात हवा असतो.

मग नुसती मूर्ती असून उपयोग नाही, त्याला नाव पाहिजे आणि त्याने माणसाला अशक्य असणाऱ्या सर्व गोष्टी केलेल्या असल्या पाहिजेत आणि त्याची कथा असली पाहिजे. (त्याचे पुरावे नसले तरी चालतील) म्हणजे अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे झाले तर ज्ञानदेवाने उडवलेली भिंत!

गेल्या १०० २०० वर्षात विद्यानाने खूप प्रगती केली. गेल्या ३० वर्षात तर विद्यानाचा प्रसार आणि प्रभाव खूपच वाढला. साधारण २० वर्षांपूर्वी अशक्य वाटणारी गोष्ट आता काहीच वाटत नाही. म्हणजे घरी बसून परदेशातील क्रिकेटचा सामना  लाइव्ह बघणे, (संदर्भ महाभारतातील संजय), विमानात बसून हवेत उडणे (अनेक संदर्भ), अशी अनेक उदाहरणे देत येतील.

आज जर एका लहान मुलीला हे सांगितले कि विमान आपोआप किंवा चमत्काराने उडते, देव उडवतोय, तर ती देखील हसेल. कारण त्यामागचे कारण कळले आहे. म्हणजे जी गोष्ट आधी चमत्कार होती, ती करणारा देव होता. त्या गोष्टीचा खुलासा आज विद्यानाने केला  आणि कारण कळले कि तिथून देवाची सुट्टी होते.

आधी संतान किंवा मुलबाळ हे देवाच्या कृपेने व्हायचे, पण आज कारण कळले आहे, त्यामुळे आज जर कोणी असे म्हटले कि आपला काय नाय बाबा, सगळी देवाची कृपा, तर लोक हसतील किंवा वेगळाच अर्थ काढतील.

याही पलीकडे अजून अनेक अशा गोष्टी आहेत कि ज्या का आणि कशा घडतात ह्याची कारणे कळलेली नाहीत. त्यामुळे ते देवच करतोय असे जरी मानले तरी हरकत नाही.

पण देवाच्या नावावर ज्या काही भाकड कथा आणि देवाचा जो काही धंदा मांडलाय तो तरी थांबवायला पाहिजे कि नाही? पण तसे होतांना दिसत नाही कारण देव म्हणजे भीती.

हे केल तर पाप लागेल, ते केल तर पाप लागेल, नरकात जाल इत्यादी इत्यादी. मग त्यासाठी उपायाचा धंदा.

म्हणजे कालसर्प योग आहे, हि पूजा करावी लागेल, सत्यनारायणाची पूजा करा, (आजकाल सत्यानारायनाचे branded  पूजेचे साहित्य मिळते), बर सत्यनारायणाची कथा ऐकल्यावर तर जास्तच भीती वाटते.

सत्यानारायनाचा प्रसाद घेतला नाही तर नौका पाण्यात बुडते, द्रव्याचा कचरा होतो, आणि पूजा करून "ब्राम्हनास खान पाण आणि दान केले" कि सत्यनारायण प्रसन्न होतो आणि कचरा परत द्रव्यात रुपांतरीत होतो.

मला एक साधा प्रश्न पडतो, जर तो देव असेल, तर तो असा खुनशी कसा काय असू शकतो? एकतरी शांत देव आहे का? कि ज्याची पूजा नाही केली तरी त्याला राग येत नाही?

बर प्रत्येक पूजेचा लाभार्थी हा ब्राम्हणच कसा काय? देवाने अस कधी का नाही सांगितल कि चांदीची गाय एका शोशितला, गरिबाला दान करा? सगळे सुके मेवे  ब्राम्हणालाच  का द्यायचे? फक्त ब्राम्हणानेच का पूजा करायची?

जसे आजकाल बरेच दवाखाने भीतीचा धंदा करतात, तसाच देवाचा धंदा करणारे वाढतच चालले आहेत. कोण लाल किताब तर कोण हनुमानाचे लोकेट विकतोय.

म्हणजे लोकांच्या वाईट परिस्थितीचा गैरवापर करून देवाच्या उपायाचे लालूच दाखवणारे धंदे आज बोकाळत चालले आहेत. कारण देव नीतीने वागायला शिकवत नसून अनीतीने केलेल्या कामांतून सुटका कशी होईल ह्याचा पर्याय झाला आहे.

११ वर्षे पाप करा आणि एकदा कुंभ मेळ्यात स्नान केले कि अकौंट नील, म्हणजे परत पाप करायला मोकळे, दोन नंबरचा पैसा कमावला कि एकदा शिर्डीला त्यातला हिस्सा समर्पित केला कि काळा पैसा पांढरा!

बर आजच्या लोकशाहीच्या काळात देवानेही परत जन्म घेवून दाखवावा आणि निवडणूक लढवून जिंकून दाखवावी.

परत देवाचीच गोष्ट सांगायची तर अनेक प्रश्न पडतात. देव आहे तर कुणाला दिसत कसा नाही, गणपती फक्त भारतातीलच लोकांना कसा माहित, किंवा भारतातील देव परदेशात का नाहीत, मग ज्यांना इतर देशातील लोक ओळखताच नाहीत, त्यांनी हि सृष्टी कशी काय निर्माण केली? आणि केली तर त्यांना साधे ओळखत पण का नाही? फक्त एकच देव का नाही? का अल्ला, जीजस, इतकी वेगवेगळी देव निर्माण झालीत? बर सगळ्यात मोठी अंधश्रद्धा हि आहे कि "सगळे धर्म एकच सांगतात!" साफ खोट आहे, जर सगळे धर्म एकच सांगत असतील, तर वेगवेगळ्या प्रथा, पद्धती का? हिंदूला जाळतात आणि मुसलमानाला पुरतात का?

श्रावण आणि गटारी गटारी अमावस्या किती विरोधाभास आहे बघा , म्हणजे रात्री १२ च्या आत पी पी दारू प्यायची आणि लगेच सकाळी पूजेला बसायचे? श्रावण संपला कि परत सगळा सुरु? बर गम्मत बघा उपवासाला काहीच खायचं नाही, अगदी निरंकार, पण सिगरेट पिला तर चालते, तंबाखू खाल्ली तर चालते, कस काय?

आज गुरुवार आहे, आज पार्टी नको? इतर दिवस चालते. म्हणजे दारू पिणे हे दिवसानुसार चांगले आणि वाईट कस काय असू शकते? म्हणजे देव फ़्लेक्जिबल आहे अस म्हणायचं का? कि आज शनिवार आहे ह, आज माझा दिवस आहे, आज दारू पिलास तर बघ, अस कुठे असते का?

सरते शेवटी, इतकी वर्षे हा प्रकार चालत आलेला  आहे, त्यामुळे काळत पण वळत नाही अशी परिस्थिती आहे.

हे सगळ मी शिकलेल्या लोकांबद्दल बोलतोय. कि ज्यांना हे सगळ  पटत, पण कृतीत आणणे कठीण जाते.

कारण फक्त अनाहूत भीती. म्हणूनच म्हणतो कि देव म्हणजे भीती. आणि म्हणूनच मी पठडीतल्या देवाला मानत नाही.

देव आहे कि नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न असू शकतो. जी लोक देव मानतात कि देवाची पूजा अर्चना करतात ती लोक वेडी आहेत किंवा वाईट आहेत अस मी मुळीच म्हणत नाही.

देव मानणे आणि देवाचे चमत्कार आणि अंधश्रद्धा मानणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बर  इतक्या वर्षांची सवय आहे कि कुणी तरी पाहिजे ना आधाराला?

मग जर देवच मानायचा ना तर सोप सांगतो, आपल्या आई वडिलांना देव माना, जे काही तुम्ही देवासाठी करता, ज्या निष्ठेने करता, त्याच्या ५०% जरी तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी केल तरी बघा चमत्कार तुमच्या घरातूनच होतील.

मंदिरात दक्षिणा देण्यापेक्षा आई वडिलांना द्या, कठीण प्रसंग आला तर देवाकडे धाव घेण्यापेक्षा आई वडिलांकडे जा, बघा नुस्त उत्तरच मिळणार नाही तर धीर पण मिळेल, शक्ती पण मिळेल आणि समाधान पण.

हे सगळा देवानेच निर्माण केलाय न, मग तुम्हाला निर्माण करणारे तुमचे आई वडिलाच आहेत न, मग तुमचा देव म्हणजे तुमचे आई वडील. ते सोडून कुठे इकडे तिकडे पळता? देव जरूर माना पण मूर्तीला नाही, तर  जिवंत आई वडिलांना.

मग सत्यानारायणाची भीती नाही, कि शनीची साडेसाती नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...

कुवत

*ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार....* आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.         दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं,"ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?" "होय. पाच सहा किलोमीटरच." मी म्हटलं. "गाडीचं इंजिन जाम झालंय... इंजिनचं काम करावं लागेल." "अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?" "ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल." "ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल?" "मिरजलाच घेऊन जावी लागेल."          त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पुढारी माझ्या दारात. *"डॉक्टर, गाडी बँकेनं ओढून नेली होय?"* त्यानं विचारलं. "कोण म्हटलं?"  "नाही, गावात कोणतरी म्हणत होतं." तासाभरात दुसरा मनुष्य. *"डॉक्टर, किती हप्ते तटले होते हो?...हप्त...